अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक मंडळाचे उद्घाटन

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील सांस्कृतिक मंडळाच्यावतीने सोमवारी (ता.१२ ऑगस्ट) महाविद्यालयात सांस्कृतिक मंडळाचे उद्घाटन व देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी बहारदार देशभक्तीपर गीते सादर करत उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा संपन्न झाली.

कार्यक्रमासाठी मंचावर अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर उपस्थित होते, संस्थेचे सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर तसेच उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर, विज्ञान विभागाचे प्रमुख प्रा. दिलीप शिंगाडे व सांस्कृतिक मंडळ प्रमुख प्रा. निलेश गोडबोले यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. सर्व मान्यवरांच्या हस्ते सांस्कृतिक मंडळाचे उद्घाटन झाले. तसेच याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, ते म्हणाले प्रत्येकाने आपला छंद जोपासला पाहिजे. आनंदासाठी छंद आणि करिअर या दोघांचीही आपल्या जीवनात सांगड घालता आली पाहिजे तसेच सांस्कृतिक मंडळाच्या विविध नावीन्यपूर्ण कार्यक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.

कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले, ते म्हणाले रत्नागिरी ही कला व संस्कृती जतन करणारी, संवर्धन करणारी भूमी आहे. त्यामुळे नव्या पिढीतील कलावंतांनी आपल्यातील कला अधिकाधिक विकसित व्हावी, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील सांस्कृतिक मंडळ हे विद्यार्थी घडवणारे केंद्र असल्याचे मतही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक उपक्रमांतील सहभाग वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले.

या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत प्रथम क्रमांक स्वातंत्र्य सूर ग्रुप (उधळीत शतकिरणा); द्वितीय क्रमांक स्वराभिषेक ग्रुप (जगी घुमवा रे) व तृतीय क्रमांक स्वर गंधार ग्रुप (देश मेरा भारती) तसेच उत्तेजनार्थ स्वरवैभव ग्रुप (जयोस्तुते जयोस्तुते) यासर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  प्रा. निलेश गोडबोले यांनी केले तर सूत्रसंचालन श्रीम. मालगुंडकर यांनी केले. उपस्थितांचे आभार श्रीम. टिकेकर यांनी मानले.

Scroll to Top