विज्ञान धारा उपक्रम - मार्गदर्शक ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री डॉक्टर शरद पांडुरंग काळे

सध्याच्या बदलत्या काळात विद्यार्थ्यांच्या मनावर बदलत्या परिस्थिती नुसार काही संस्कार होणे महत्त्वाचे आहे त्यातीलच एक म्हणजे विज्ञान संस्कार. शालेय जीवनक्रमात 30-35 मिनिटांच्या तासिकेमध्ये विज्ञान समजणे व त्यावर विचार होणे हे दुरापस्त होत आहे. विद्यार्थ्यांच्या  मनावर  विज्ञान सृजनाचा संस्कार व्हावा व त्यानी स्वतः विज्ञान अभ्यासावे या उद्देशाने निवृत्ती नंतरचे आयुष्य विज्ञान संवादात, प्रसारात घालवणारे विज्ञानव्रती ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री डॉक्टर शरद काळे यांनी रत्नागिरीतील  र. ए. सोसायटीच्या अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांशी दिनांक 7 ऑक्टोबर रोजी  विज्ञानावर मुक्त संवाद साधला

ग्रंथाली प्रकाशनसोबत या उपक्रमाची सुरुवात त्यानी “विज्ञान धारा” या व्यासपीठवरून 2022 पासून केली आहे.

डॉ.शरद काळे हे भाभा अणुसंशोधन केंद्रातून निवृत्त झाले आहेत. जैवविघटनशील कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोगॅस निर्मितीचे तंत्रज्ञान त्यानी विकसित केले असून भारतभर हे तंत्रज्ञान अनेक संस्था उपयोगात आणत आहेत.

राधाबाई शेट्ये सभागृहात कनिष्ठ महाविद्यालयाच्या  विद्यार्थ्यांशी त्यांनी हितगुज केले. दैनंदिन विज्ञान जीवनात कसे आचरणात आणावे, आपल्याला प्राप्त असलेल्या एकमेव पृथ्वी ग्रहाचे आपणच संरक्षण केले पाहिजे हे त्यानी विदयार्थ्यांना समजावून दिले. त्यासाठी आपल्या घरापासून सुरवात करायला हवी असं ते म्हणाले. आपल घर कचरा मुक्त कसं ठेवता येईल याची प्रत्येक विद्यार्थ्याने काळजी घेण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले. सर्व विद्यार्थ्यांकडून स्वच्छतेची शपथ घेतली, अन्न वाया जाणार नाही याची काळजी घेण्याची देखील शपथ घेतली. यांच्या व्याख्यानादरम्यान उत्कृष्ट प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्याला त्याने ग्रंथाली तर्फे देण्यात येणारे “कुतूहल रत्न” हे प्रमाणपत्र देखील दिले. त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे सहकारी पुणे विद्यापीठाचे डॉक्टर देवपूरकर यांनी देखील विद्यार्थ्यांशी संवाद साधला व विद्यार्थ्यांनी मूलभूत विज्ञानाकडे वळावे असे आवाहन केले अभ्यंकर कुलकर्णीच्या सुमारे 500 विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मकरंद साखळकर यांच्या मार्गदर्शनानुसार  उपप्राचार्य सुनील गोसावी व इतर विज्ञान शिक्षक सहकारी यांनी कार्यक्रमाचे  सुंदर आयोजन केले.

रत्नागिरी तसेच राजापूर व आडिवरे येथील शाळांना भेट देऊन तेथील विद्यार्थी व शिक्षकांशी ते मुक्त संवाद साधणार आहेत.

Scroll to Top