पुस्तकी ज्ञानासोबत उद्योगजगताची ओळख – विद्यार्थ्यांची चितळे डेअरीला औद्योगिक भेट

( दिनांक १० मार्च २०२६ )

भिलवडी येथील प्रकल्पात ‘काऊ टू क्लाउड’ तंत्रज्ञान, स्वयंचलित प्रक्रिया आणि आधुनिक डेअरी व्यवस्थेचा विद्यार्थ्यांनी घेतला प्रत्यक्ष अनुभव.

रत्नागिरी : पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक कार्यपद्धतीची ओळख व्हावी, या उद्देशाने रत्नागिरी येथील र. ए. सोसायटीच्या अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नुकतीच सांगली जिल्ह्यातील भिलवडी येथील जगप्रसिद्ध ‘चितळे डेअरी’ला औद्योगिक भेट दिली. या अभ्यास सहलीत HSC Vocational ( MCVC ) विभागाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या औद्योगिक भेटीचे वैशिष्ट्य म्हणजे चितळे डेअरीच्या सौ. अनघा चितळे मॅडम यावेळी आवर्जून उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत या विशाल प्रकल्पाची आणि त्याच्या प्रगतीची माहिती दिली. १९३९ साली भास्कर गणेश चितळे यांनी सुरू केलेल्या या व्यवसायाने आज जागतिक पातळीवर कशी ओळख निर्माण केली आहे, याचा प्रेरणादायी प्रवास त्यांनी विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखवला.

या सहलीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी, मेडिकल लॅब टेक्निशियन (MLT), अकाउंटिंग अँड ऑडिटिंग आणि लॉजिस्टिक अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट या चारही विभागांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. कृष्णा नदीच्या तीरावर वसलेल्या या प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांनी दूध संकलनापासून ते पॅकेजिंगपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया जवळून पाहिली. दुधाला कुठेही मानवी हाताचा स्पर्श न होता चालणारी स्वयंचलित यंत्रणा, ‘काऊ टू क्लाउड’ हे प्रगत तंत्रज्ञान, गुरांसाठी वापरण्यात येणारे RFID टॅग्स तसेच गुणवत्तेसाठी असणाऱ्या अत्याधुनिक लॅब्सची कार्यप्रणाली विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवली. तसेच, एवढा मोठा उद्योग पर्यावरणपूरक पद्धतीने कसा चालवला जातो, याचेही मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले.

चितळे डेअरीच्या अभ्यासपूर्ण औद्योगिक भेटीनंतर विद्यार्थ्यांनी परिसरातील ऐतिहासिक व धार्मिक स्थळांनाही भेट दिली. औदुंबर येथील श्री क्षेत्र दत्तमंदिर आणि खिद्रापूर येथील प्राचीन व ऐतिहासिक कोपेश्वर मंदिराला भेट देत विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक वास्तुकलेचाही अभ्यास केला.

या अभ्यास सहलीसाठी विद्यार्थ्यांसोबत र. ए. सोसायटीचे जाॅईट सेक्रेटरी आणि HSC Vocational ( MCVC ) विभागप्रमुख प्रा. श्रीकांत दुदगीकर, इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीचे प्रा. योगेशानंद हळबे, अकाउंटिंग अँड ऑडिटिंगच्या प्रा. रिद्धी हजारे, मेडिकल लॅब टेक्निशियनच्या प्रा. स्नेहा पेवेकर, पर्यावरण (EVS) विषय शिक्षक ऋषीराज नागवेकर आणि रमाश कालकर हे उपस्थित होते. सर्व प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली ही अभ्यास सहल विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माहितीपूर्ण आणि यशस्वी ठरली.

माहिती संकलन : प्रा. योगेशानंद हळबे

chitale-dairy-industrial-visit
Scroll to Top