प्राचार्यांचे मनोगत

dr-makrand-sakhalkar

माननीय श्री. बाबुराव जोशी आणि सौ. मालतीबाई जोशी यांनी एका उदात्त, व्यापक विचारातून या संस्थेची पायाभारणी केली. या कार्याची इमारत आदर्शांच्या भक्कम पायावर उभी आहे. ”एते सत्पुरुषा: परार्थ घटका: स्वार्थान्‌ परित्यज्य ये” या आदर्शाचे अनुसरण करणाऱ्या जोशी दांपत्याने या संस्थेचा श्रीगणेशा केला. अवघ्या कुटुंबाचे प्रेयस-श्रेयस साधण्यासाठी कुटंब प्रमुखाने जसे परिश्रम घ्यावे तसेच अथक परिश्रम घेऊन उभयतांनी ही संस्था आकाराला आणली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जोशी पती-पत्नींनी शून्यातून स्वर्ग निर्माण करायचा प्रयत्न केला.

सुरवातीस १ जानेवारी १९२५ रोजी त्यांनी ३ मुलींना घेऊन आपल्या घरीच महिला विद्यालयाची स्थापना केली. हीच कोकणातील मुलींची पहिली शाळा व यातूनच संस्थेच्या कार्याचे बीजारोपण झाले. त्यानंतर १९४५ मध्ये महाविद्यालयाची आणि १९४७ मध्ये शिर्के प्रशालेची स्थापना झाली. महाराष्ट्रात शासनाच्या शैक्षणिक धोरणानुसार २ स्तरावरील अभ्यासक्रम कनिष्ठ महाविद्यालयामध्ये १९७६ मध्ये सुरु झाला. कालांतराने पुढे व्यावसायिक शिक्षणाची गरज लक्षात घेऊन एम.सी.व्ही.सी. विभागही सुरु झाला, विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात आता माहिती तंत्रज्ञान, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स हे विषय सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी उपलब्ध करून दिले आहेत. आज या कनिष्ठ महाविद्यालयात ३००० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

ज्या जोशी दांपत्याने हे छोटेसे रोप लावले, त्यांचे आम्ही आजन्म ऋणी आहोत. हे ऋण फिटणारे नाही, काही ऋणे अशी असतात की जी फेडता येत नाहीत. यांच्याकडून जे मिळाले ते वृद्धींगत करुन पुढील पिढीच्या हाती सुपूर्द करणे हाच त्यावर एकमेव उपाय असतो आणि हाच मार्ग आम्ही अनुसरतो आहोत.

डॉ. मकरंद साखळकर
प्राचार्य

Scroll to Top