अश्मयुगापासून ते मध्ययुगापर्यंतचा उलगडला इतिहास: भीमबेटकापासून सांचीपर्यंत मध्यप्रदेशातील वारसास्थळांना इतिहासाच्या विद्यार्थ्यांची भेट

अभ्यंकर–कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील इतिहास विषयाच्या विद्यार्थ्यांनी मध्यप्रदेशातील भोपाळ व विदिशा परिसरातील ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसास्थळांना भेट देत उत्तर पुराश्मयुगीन काळापासून ते बाराव्या शतकापर्यंतच्या इतिहासाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

या अभ्यास सहलीत विद्यार्थ्यांनी सांची स्तूप, सतधारा स्तूप, उदयपूर येथील नीलकंठेश्वर मंदिर, ग्यारसपूर येथील ब्रजमठ मंदिर, देखीनाथ स्तूप, आठखंबा मंदिर, हिंदोळा तोरण, मालादेवी मंदिर तसेच विदिशा व भोपाळ येथील संग्रहालयांचे अवलोकन केले. गुर्जर–प्रतीहार काळातील नीळकंठेश्वर व मालादेवी मंदिरे ही नागर शैलीतीलस्थापत्याची उत्कृष्ट उदाहरणे असून त्यामध्ये हिंदू व जैन स्थापत्यशैलीचा सुंदर संगम विद्यार्थ्यांना अभ्यासता आला. याचबरोबर उदयगिरी गुंफा व हेलिओडोरस स्तंभ यांसारख्या महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांबाबतमाहितीघेण्यात आली. तसेच पृथ्वीचे कर्कवृत्त (Tropic of Cancer) ज्या ठिकाणाहून जाते तेथेही विद्यार्थ्यांनी भेट दिली.

विदिशा येथील सतधारा स्तूप येथे दिलेल्या भेटीवेळी दार्जीलिंग येथील काहीबौद्ध भिक्षू स्तूपाची प्रार्थना आणि अन्य धार्मिक विधी करण्यासाठी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने त्यांच्याशी संवाद साधत बौद्ध धर्मातील प्रार्थना, धार्मिकविधी व त्यामागील आध्यात्मिक अर्थ जाणून घेतला; तसेच त्यांच्या पूजाविधींमध्ये सहभाग नोंदवला. या थेट संवादामुळे इतिहासाशी जोडलेले जिवंत धार्मिक व सांस्कृतिक जीवन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवता आले.

यानंतर विद्यार्थ्यांनी प्रागैतिहासिक कलेसाठी प्रसिद्ध असलेल्या जागतिक वारसा स्थळ भीमबेटका याठिकाणी भेट दिली. येथे आदिम काळातील मानवांनी अनेक गुहा व शैलाश्रयांचा (रॉक शेल्टर) वापर केला होता. त्यांचा वापर पुराश्मयुगापासून ऐतिहासिक तेमध्ययुगीन काळापर्यंत सातत्याने केला जात होता. त्यागुहांमध्ये प्राण्यांची हाडे, दगडी अवजारे, दफने आणि दैनंदिन वापराच्या वस्तू सापडल्या. विद्यार्थ्यांनी येथेपाहिलेल्या शैलचित्रांमध्ये पाळीव व वन्य प्राणी, शिकारीचे प्रसंग, मासेमारी, नृत्य, संगीत, धार्मिक विधी, जन्म-मृत्यूच्या घटना यांचा समावेश होता. प्रागैतिहासिक मानवाच्याजीवनाचे चित्रकलेद्वारे उमटलेलेप्रत्यक्ष आलेखतेथीलभिंतींवरपाहून विद्यार्थी स्तिमित तसेचआश्चर्यचकित झाले.

सहलीच्या शेवटच्या दिवशी मध्यप्रदेश शासनातील उच्च शिक्षण, आयुष व तांत्रिक शिक्षण मंत्री श्री. इंदर सिंह परमार यांनी मध्यप्रदेश भेटीवर आलेल्या विद्यार्थ्यांची आवर्जून भेट घेतली. इतिहास विभागाच्या चालू उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांना भारतीय ज्ञानपरंपरेचा वारसा जपून विकसित भारत घडविण्याची जबाबदारी स्विकारण्यासंबंधी मार्गदर्शन केले.

इतिहास शोध व बोध मंडळातर्फे आयोजित ही शैक्षणिक अभ्यास सहल दि. २६ ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत यशस्वीपणे पार पडली. या सहलीत एकूण ३१ विद्यार्थी व ४ शिक्षक सहभागी झाले होते. पुरातत्त्व अभ्यासक श्री. मंदार चौधरी यांनी संपूर्ण सहलीदरम्यान मार्गदर्शक म्हणून सखोल व अभ्यासपूर्ण माहिती दिली. सहलीचे सुयोग्य नियोजन श्री. निनाद तेंडुलकर व श्री. पंकज घाटे यांनी केले, तर सहलीच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीम. तन्वी कोळंबेकर व श्रीमती अपर्णा तगारे यांनी मोलाचे सहकार्य केले. या शैक्षणिक अभ्यास सहलीच्या नियोजनासाठी अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी व पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर यांचे मार्गदर्शन लाभले.

img-1
img-2
img-4
img-6
img-10
img-7
img-9
img-5
img-3
img-8
Scroll to Top